Saturday, May 22, 2010शिवरायांची महती अवर्णनीय - अमोल कोल्हे
सकाळ वृत्तसेवा
पुणे - ""शिवछत्रपतींच्या कार्याची महती अवर्णनीय आहे. त्यामुळेच साडेतीनशे वर्षे उलटूनही महाराष्ट्राने त्यांना आपल्या हृदयात जपले आहे. "शिवाजी महाराज जन्माला यावेत ते माझ्याच घरात' अशी काळानुरूप बदललेली सर्वसामान्यांची भूमिका आज अनुभवण्यास मिळते,'' अशी भावना प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

वसंतदादा सेवा संस्था प्रियांकाजी महिला उद्योग संस्था यांच्यातर्फे यंदाचा "राजीव गांधी कला गौरव पुरस्कार' डॉ. कोल्हे यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, संस्थेचे अध्यक्ष संजय बालगुडे, संजीवनी बालगुडे, सुनील महाजन, बालकलाकार मंदार चिकणे या प्रसंगी व्यासपीठावर होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, ""शिवछत्रपतींची भूमिका साकारल्यामुळे जो सन्मान मिळतो, तो माझा एकट्याचा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. महाराजांची नुसती भूमिका करण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणणे महत्त्वाचे आहे. यापुढे हेच ध्येय ठेवून वाटचाल करणार आहे. पूर्वी "शिवाजी महाराज जन्मावे ते शेजारच्या घरात' अशी भावना आता बदललेली पहावयास मिळते. आज प्रत्येक मुलाला आपण महाराज व्हावे असे वाटणे हीच त्यांच्या कार्याची महती आहे.''

मोरे म्हणाले, ""शिवछत्रपतींचे कार्य इतके समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे, की ते सतत नव्या स्वरूपात समोर आणावे लागणार आहे. आज त्यांची विचारसरणी समोर ठेवून काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे.''

बागवे म्हणाले, ""जाती-धर्माच्या पलीकडे गेलेले आणि सर्वसामान्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असणारे शिवछत्रपतींनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. कार्यकर्त्यांनी नेहमीच त्यांचा आदर्श ठेवावा. देशाच्या आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन ज्यांनी सतत कार्य केले, अशा राजीव गांधींच्या स्मृतिनिमित्त दिला जाणारा पुरस्कार ही गौरवाची बाब आहे.''
बालगुडे यांना प्रास्ताविक केले.

No comments: