Saturday, May 22, 2010

पुन्हा शिवाजी महाराज अवतरणार
-
Friday, May 21, 2010

मुंबई - "राजा शिवछत्रपती' या मालिकेत शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारून डॉ. अमोल कोल्हे घरोघरी पोचले होते. ही मालिका आणि त्यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका कमालीची लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा तीच भूमिका साकारायचे ठरविले आहे. "राजमाता जिजाऊ' या चित्रपटात ते छत्रपती शिवाजी महाराज बनलेले आहेत.

निर्मात्या मंदाताई निमसे आणि दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई यांचा जीवनपट "राजमाता जिजाऊ' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर ठेवण्याचे ठरविले आहे. यामध्ये जिजाबाईंची भूमिका सिंदखेडजवळील चिखली गावातील डॉ. स्मिता देशमुख साकारीत आहेत; तर छत्रपती शिवाजी डॉ. अमोल कोल्हे बनलेले आहेत. पुण्याजवळील भोरच्या वाड्यात तसेच पैठण येथे या चित्रपटाचे आतापर्यंतचे चित्रीकरण झालेले आहे. याबाबत दिग्दर्शक यशवंत भालकर म्हणाले, ""अमोल कोल्हे यांची "राजा शिवछत्रपती' ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.

माझ्या घरची मंडळी ती पाहात होते. त्यांनीच मला तुम्ही शिवरायांच्या भूमिकेसाठी अमोल यांना घ्यावे, असा आग्रह धरला. त्यामुळे अन्य कुणाचा विचार न करता आपण त्यांची निवड केली. कारण एखाद्या नवोदिताची निवड केली असती, तर त्याने त्या भूमिकेला कितपत न्याय दिला असता, असा प्रश्‍नही माझ्यासमोर होता. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ""खरोखरच "राजा शिवछत्रपती' मालिकेबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. निर्माते नितीन देसाई यांनी उच्च निर्मितीमूल्यांतून ही मालिका बनविली होती. यामध्ये आपण साकारलेली छत्रपतीची भूमिका अवघड होती. ही भूमिकेमुळेच "राजमाता जिजाऊ' हा चित्रपट आपणास मिळाला. त्या मालिकेत आपण एका जाणत्या राजाची भूमिका केली होती. आता या चित्रपटात आदर्श मुलगा आपण बनलो आहोत. पुन्हा शिवाजी महाराज साकारायला मिळाले त्याबद्दल आपणास आनंद आहे.''

posted by- स्वप्नील कदम (मंदाताई निमसे आणि अमोल कोल्हे ह्यांच्या परवानगी वरून..)

original news- संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवा..thanks..


अधिक माहितीसाठी - www.rajmatajijau.com

No comments: